Saturday, 27 May 2023

कचरा व शेतीचं नुकसान

 "मातीच असशी मातीत मिसळशी" हे वचन आपण नेहमी ऐकतो, वाचतो. पण ही मातीच नीट शिल्लक रहाणार नाही असं कोणी म्हणालं तर विश्वास बसणार नाही. 

होय! ५० वर्षांनी शेतीसाठी उपयोगी मातीच रहाणार नाही आणि याचं कारण आपण करत असलेलं चुकीचं कचर्‍याचं नियोजन. 

पृथ्वीवर प्रत्येक प्रक्रिया 'चक्रनेमिन्यायाने' होते. सजीव जन्म घेतो आणि मृत्यु पावतो. मृत शरीर मातीत एकरूप होऊन नवीन सजीव तयार करण्यासाठी खनिजं आणि इतर द्रव्य पुरवते. 


वाचकांच्या मनात साहजिक प्रश्न येईल की हे तर बरोबर आहे पण याचा कचर्‍याच्या चुकीच्या नियोजनाशी काय संबंध? 


याचा संबंध खालीलप्रमाणे—


आपण दरदिवशी बाजारातून भाजी, फळे इ. विकत आणतो. त्याचा अन्नात वापर करतो आणि उपयोग नसणारा भाग फेकून देतो. पण आपण निरूपयोगी भाग कुठे फेकतो? —कचरापेटीत. 


ही कचरापेटी कुठे जाते? 

वरील प्रश्नाची लोकं दोन उत्तरं देतात.

१. मला काय माहीत? 

२. मी टॅक्स भरलेला आहे, कचरापेटीचं काय करायचं तो नगरपरिषदेचा प्रश्न आहे. त्यांचं ते पाहून घेतील. 


माझ्यामते ०.००१ ॰/॰ माणसांना या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे. 

हा कचरा 'डंपिंग ग्राऊंडवर' जातो. 


पुढे त्याचं काय होतं? 

—काहीही नाही. तो कचरा तिथेच कुजतो आणि हवा पाणी व मातीचं प्रदूषण करतो. 


मग याचा शेतीशी काय संबंध? 

नैसर्गिकरित्या कोणतंही झाडं किंवा त्याचा अवयव मेल्यावर मातीत मिसळून दुसर्‍या झाडांना खत म्हणून उपयोगात येतो. ही प्रक्रिया लाखो वर्षं अविरत होत आहे. 


आपण ज्यावेळी डंपिंग ग्राऊंडवर कुजू शकणारा कचरा पाठवतो त्यावेळी तो कचरा तिथे चुकीच्या पद्धतीने कुजून फक्त प्रदूषण करतो. वर या कचर्‍यामधे प्लास्टीक व इतर पदार्थही मिसळलेले असतात ज्यायोगे कुजण्याची प्रक्रिया प्राणवायुविरहित होऊन अॅसिड्स तयार होतात. 


अंततः या विघटनशील कचर्‍याचा विनियोग चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्यातील घटक, जे नवीन सजीव (झाडे) निर्माण होण्यासाठी उपयोगी आहेत ते व्यर्थ जातात आणि निसर्गाने नेमून दिलेलं लाखो वर्षांचं चक्र पूर्णच होत नाही. 


उदारण देतो. एखाद्या धरणाला पाण्याचा ओहोळ येऊन तिथे पाणी साठवतो. आपण धरणाच्या पाण्याचा उपसा करत असू आणि त्यावेळीच जर ओहोळ बुजवून बंद करून टाकत असू तर धरणातील पाणी एकेदिवशी संपेल आणि आपल्याला पाणीच मिळणार नाही. 


त्याप्रमाणे शेतीतून आपण उत्पन्न घेतोय मात्र त्या शेतातील झाडांचे जे अवयव आपल्याला उपयोगी नाहीत ते आपण शेतात परत पाठवत नाही. मग अशाने शेतातून मिळणारं उत्पन्न एकेदिवशी बंद नाही का होणार?


यावर उपाय म्हणजे जो विघटनशील कचरा आपण तयार करतो, तो मातीत मिसळून टाकणे. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात तो कचरा मिसळून खत तयार करायला देणे. यामुळे कचर्‍याचं नीट नियोजन होईल, लाखो वर्षांपासून अविरत चालू असलेलं चक्र नीट पुढेहि चालू राहील आणि त्यामुळे मनुष्यजीवनाची हानी होणार नाही. 

नाहीतर वर्षानुवर्षे डंपिंग ग्राऊंडवर कचरा कुजून आणि जाळून त्यातील महत्वाची घटकद्रव्ये निरूपयोगी होतील आणि एकेदिवशी माणसं उपासमारीने मरतील. 


—डाॅ. नीरज पाटील

No comments:

Post a Comment

घनकचरा नियोजनाची फ्रेंचकथा!

फ्रान्स हा ६ कोटी लोकसंख्येचा बारिकसा देश.  २०१६ मधे साधारण ४.६टन कचरा प्रत्येक नागरिकामागे हा देश तयार करत होता. यातला ८०,००० टन कचरा तिथल्...