Saturday, 24 June 2023

कचरा, डंपिंग ग्राउंड आणि समस्या.


१. डंपिंग ग्राऊंडला आग का लागते?
एकत्र फेकलेल्या कचर्‍याने.
आपण घरातला ओला आणि सुका कचरा एकत्र फेकतो. ओला कचरा डंपिंग ग्राऊंडवर कुजतो, मिथेन गॅस तयार होतो आणि तो पेट घेतो. कचर्‍यातील प्लास्टीक, कागद लगेच पेट घेतात आणि आग सगळीभर पसरते. 

२. कचर्‍यावर उपाय काय? 
कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावणे. 
घरगुती स्वरूपातील कचरा खालीलपणे वेगळा करणें.
अ. प्लास्टीकः प्लास्टीक पिशव्या न वापरणे हा पहिला उपाय. घरात कमीतकमी प्लास्टीक येऊ देणे. पूर्ण टाळणं शक्य नाही पण नाईलाजाने आलेलं प्लास्टीक जमा करून धुवून वाळवून रिसायकल करायला देणे. प्लास्टीक बाटल्या, डबे भंगारात विकणें

आ. कागदः कोणत्याही प्रकारचा कागद, पावत्यासुद्धां रिसायकल करता येतात. सगळा कागद वेगळा गोळा करून रद्दीत देणें.

इ. धातूः जवळपास घरगुती कचर्‍यातील सगळेच धातू भंगारात जातात. दाढीच्या ब्लेडसहित सगळे भंगारात देणें. स्टेपलरच्या पिनासुद्धा वेगळ्या डबीत गोळा करून भंगारात देणें. 

ई. अन्नाचा कचरा व इतर ओला कचराः जाळीदार बास्केट विकत आणूनत्याच्या तळाशी मातीचा थर पसरणें. त्यावर कचर्‍याचा थर असे आलटून पालटून थर देणें. कचरा कुजतो, वास येत नाही.. कंपोस्ट खत तयार होतं. खत झाडांसाठी वापरणें. 

उ. निर्माल्य स्वतंत्र मातीच्या कुंडीत गोळा करून त्यावरही दरदिवशी मातीचा थर पसरवणें, कुंडी भरली की त्यात मिरची कोथिंबीर पेरणे. महिन्याचे २००—५०० रुपये यात सुटतात. 

ऊ. आॅफीसमधे फाडलेले कागद आॅफीसमधेच गोळा करून रद्दीत विकणे. 

***हाॅटेलमधून अन्न पार्सल आणताना घरून स्टीलचे डबे नेणें. यामुळे अॅल्युमिनिअमचे कंटेनर घरात येत नाहीत. 

***

वरील उपायांचे काटेकोर नियोजन केले तर घरातला कचरा अजिबात डंपिंग ग्राऊंडवर जात नाही आणि पुढचे प्रश्न वाचतात. 

भारतात शहरातली एक व्यक्ती सरासरी ५०० ग्रॅम कचरा दरदिवशी तयार करते. ग्रामीण भागात सरासरी २०० ग्रॅम कचरा प्रतिव्यक्ती तयार होतो. म्हणूनच,

Refuse: नकार द्या 
Reduce: प्रमाण कमी करा
Reuse: पुन्हा वापरा 
Recycle: सर्वात शेवटचा उपाय म्हणून रिसायकल करा. 

वरचे चार नियम वापरले तर कचर्‍याच्या अडचणी ९९% नष्ट होतात.

डाॅ. नीरज सुनील पाटील.

Wednesday, 7 June 2023

औद्योगिक कचरा—किचकट समस्याः भाग २


औद्योगिक कचर्‍याची तोंडओळख मागील भागात केली. या भागापासून या कचर्‍यावर उपाय काय व कसे केले जातात व त्यासंबंधीचें नियम यासंबंधी विवेचन. 

औद्योगिक कचरा तयार करणार्‍या संस्थांना Reduce Reuse Recycle या तीन R चा पर्याय दिला आहे. 
ज्यानुसार, 
कचरा कमीतकमी कसा तयार होईल, 
तयार झालेला कचरा पुन्हा कसा वापरता येईल व त्याचे पुनर्चक्रीकरण (Recycling) कसें करता येईल, 
कचर्‍यातून वेगवेगळे पदार्थ/रसायने वेगळी काढणे, 
कचरा Co-processing अर्थात ज्वलनासाठी इंधन म्हणून पुरवणें, 
आणि सर्वात शेवटचा पर्याय—त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणें 
औद्योगिक संस्थांना वरील सर्व पर्याय वापरता येतात. 
 
यामध्ये कचर्‍याच्या सुरक्षित विल्हेवाटीची व्यवस्था करणें ही कंपनीचालकाची जबाबदारी आहे. अशा कचर्‍याच्या वहनासाठी विशिष्ट नियमांतर्गत वाहने वापरता येऊ शकतात. ही वाहने घातक औद्योगिक कचरा वगळता इतर कुठचेही दुसरे जिन्नस वाहून नेऊ शकत नाहीत. हा कचरा वाहून नेण्यासाठी बॅरल्स वापरता येऊ शकतात मात्र हे बॅरल्सही असा कचरा वगळतां दुसरे साहित्य ठेवण्यासाठी वापरता येत नाही, तसेंच हे बॅरल्स कुठेही फेकून दिले न जाता कचरा विल्हेवाट लावणार्‍या संस्थेकडेच विह्लेवाटीसाठीं सुपूर्द केलें जातात.  

वरीलपैकी घातक औद्यौगिक कचर्‍याचा इंधन म्हणून वापर (Pre-processing and Co-processing) कसा करतात ते या लेखात समजून घेऊ. 

भारतामधें वरील संकल्पना उद्योग क्षेत्रामध्यें अलिकडेच रुळण्यास सुरूवात झाली आहे. यामागचें कारण इंधनाचें दर व तुटवडा. 
भारतामध्यें बहुतांश कोळसा आयात केला जातो. कोळशाचा वापर सिमेंट उद्योग, लोखंड उद्योग व इतर बर्‍याच ठिकाणी केला जातो. 
सिमेंट उद्योगामध्यें हल्ली कोळशाबरोबर काही प्रमाणात इंधन म्हणून घातक औद्यौगिक कचरा वापरला जातो. एरव्ही जो औद्यौगिक कचरा क्षेपणभूमी (landfill/dumping ground)मधें जात असें, तो आतां इंधन म्हणून वापरतात व scrubber सारखी प्रदूषण घटक शोषणारी उपकरणे वापरून ज्वलनापासून होणार्‍या धुराचें नियंत्रण केलें जाते. 

औद्यौगिक कचर्‍याचा इंधन म्हणून वापर करण्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी लागते. सिमेंट उद्योगांत अशा पदार्थांचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी पर्यावरण (संवर्धन) अधिनियम, १९८६ (१९८६चा २९वा अधिनियम) अंतर्गत केलेल्या तरतुदींना धरून असा प्रयोग करता येऊं शकतो. 
साधारणपणें कोळशाबरोबर औद्योगिक घातक कचरा ६०:४० या प्रमाणात किंवा ७०:३० प्रमाणामध्ये वापरला जातो, ज्यामुळे परकीय चलन वाचते. तर, अशाप्रकारे औद्योगिक कचरा इंधन म्हणून वापरल्याने कोळशाला पर्याय व विनाकारण कचरा incineratorमध्ये जाळल्यानें होणारे प्रदूषण टाळता येते. 


घनकचरा नियोजनाची फ्रेंचकथा!

फ्रान्स हा ६ कोटी लोकसंख्येचा बारिकसा देश.  २०१६ मधे साधारण ४.६टन कचरा प्रत्येक नागरिकामागे हा देश तयार करत होता. यातला ८०,००० टन कचरा तिथल्...