औद्योगिक कचर्याची तोंडओळख मागील भागात केली. या भागापासून या कचर्यावर उपाय काय व कसे केले जातात व त्यासंबंधीचें नियम यासंबंधी विवेचन.
औद्योगिक कचरा तयार करणार्या संस्थांना Reduce Reuse Recycle या तीन R चा पर्याय दिला आहे.
ज्यानुसार,
कचरा कमीतकमी कसा तयार होईल,
तयार झालेला कचरा पुन्हा कसा वापरता येईल व त्याचे पुनर्चक्रीकरण (Recycling) कसें करता येईल,
कचर्यातून वेगवेगळे पदार्थ/रसायने वेगळी काढणे,
कचरा Co-processing अर्थात ज्वलनासाठी इंधन म्हणून पुरवणें,
आणि सर्वात शेवटचा पर्याय—त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणें
औद्योगिक संस्थांना वरील सर्व पर्याय वापरता येतात.
यामध्ये कचर्याच्या सुरक्षित विल्हेवाटीची व्यवस्था करणें ही कंपनीचालकाची जबाबदारी आहे. अशा कचर्याच्या वहनासाठी विशिष्ट नियमांतर्गत वाहने वापरता येऊ शकतात. ही वाहने घातक औद्योगिक कचरा वगळता इतर कुठचेही दुसरे जिन्नस वाहून नेऊ शकत नाहीत. हा कचरा वाहून नेण्यासाठी बॅरल्स वापरता येऊ शकतात मात्र हे बॅरल्सही असा कचरा वगळतां दुसरे साहित्य ठेवण्यासाठी वापरता येत नाही, तसेंच हे बॅरल्स कुठेही फेकून दिले न जाता कचरा विल्हेवाट लावणार्या संस्थेकडेच विह्लेवाटीसाठीं सुपूर्द केलें जातात.
वरीलपैकी घातक औद्यौगिक कचर्याचा इंधन म्हणून वापर (Pre-processing and Co-processing) कसा करतात ते या लेखात समजून घेऊ.
भारतामधें वरील संकल्पना उद्योग क्षेत्रामध्यें अलिकडेच रुळण्यास सुरूवात झाली आहे. यामागचें कारण इंधनाचें दर व तुटवडा.
भारतामध्यें बहुतांश कोळसा आयात केला जातो. कोळशाचा वापर सिमेंट उद्योग, लोखंड उद्योग व इतर बर्याच ठिकाणी केला जातो.
सिमेंट उद्योगामध्यें हल्ली कोळशाबरोबर काही प्रमाणात इंधन म्हणून घातक औद्यौगिक कचरा वापरला जातो. एरव्ही जो औद्यौगिक कचरा क्षेपणभूमी (landfill/dumping ground)मधें जात असें, तो आतां इंधन म्हणून वापरतात व scrubber सारखी प्रदूषण घटक शोषणारी उपकरणे वापरून ज्वलनापासून होणार्या धुराचें नियंत्रण केलें जाते.
औद्यौगिक कचर्याचा इंधन म्हणून वापर करण्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी लागते. सिमेंट उद्योगांत अशा पदार्थांचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी पर्यावरण (संवर्धन) अधिनियम, १९८६ (१९८६चा २९वा अधिनियम) अंतर्गत केलेल्या तरतुदींना धरून असा प्रयोग करता येऊं शकतो.
साधारणपणें कोळशाबरोबर औद्योगिक घातक कचरा ६०:४० या प्रमाणात किंवा ७०:३० प्रमाणामध्ये वापरला जातो, ज्यामुळे परकीय चलन वाचते. तर, अशाप्रकारे औद्योगिक कचरा इंधन म्हणून वापरल्याने कोळशाला पर्याय व विनाकारण कचरा incineratorमध्ये जाळल्यानें होणारे प्रदूषण टाळता येते.
No comments:
Post a Comment